सहकार महर्षी दत्ताजीराव कदम आण्णांच्या स्मृतींना श्री दत्त साखरच्या वतीने अभिवादन!
सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला भक्कम दिशा देणारे, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत सहकाराची भक्कम चळवळ उभी करणारे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबूराव कदम (आण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या स्व.कदम आण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दत्ताजीराव कदम आण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच सहकार क्षेत्रातील योगदानाची परंपरा जपणाऱ्या अन्य मान्यवरांनाही अभिवादन करण्यात आले. स्व. सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास संचालक रणजित अशोक कदम, तर स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित संचालक आणि मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्व. दत्ताजीराव कदम आण्णांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद आणि कामगारांना आर्थिक व सामाजिक प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. श्री दत्त साखर कारखान्याची स्थापना करून त्यांनी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित व्यासपीठ दिले. सहकार, शेती आणि उद्योग यांची सांगड घालत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली सहकाराची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजित पाटील, विजय सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील-हालसवडे, कामगार संचालक प्रदिप बनगे, माजी नगरसेवक अजय भोसले, महादेव कुलकर्णी, उत्तम पाटील, शिवाजी पाटील-कौलवकर, महंमद मुल्ला तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, मॅनेजर फायनान्स संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए.एस. पाटील, वर्क्स मॅनेजर एस.ए.चौगुले, प्रॉडक्शन मॅनेजर एम.एस. जाधव, सिव्हील इंजिनियर जयंता जंगम, सिव्हील इंजिनिअर यशवंतराव माने, अनिलकुमार सुतार, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, गेस्टहौस इनचार्ज शक्तिजीत गुरव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, एचआर मॅनेजर जयदिप देसाई, हेड टाईम किपर अरुण पाटील, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही. आर. इंगळे, स्टोअर किपर एस. व्ही. शिंदे, चिफ सिक्युरिटी ऑफिसर पी.एम. चौगुले, पीएटू चेअरमन विलास माने, आयटीआयचे प्राचार्य बी. बी. पाटील यांचेसह कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक), श्री दत्त भांडार, श्री दत्त ऊस तोडणी वाहतूक संघटना या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार क्षेत्रात दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि शेतकरीहिताचा आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. दत्ताजीराव कदम आण्णांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.