बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप!पुलाची शिरोलीत शायना एनसीच्या पुतळ्याचे दहन; शिवसेना ठाकरे गट आक्रमक, कठोर कारवाईची मागणी
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पत्रकार परिषदेदरम्यान फाडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केलेल्या या कथित कृतीचे वृत्त प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित होताच शिवसैनिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शायना एनसी यांच्या पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेंद्र इंदुलकर यांच्या आदेशानुसार, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
बाळासाहेबांचा अवमान खपवून घेणार नाही!
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि हिंदुत्वाच्या विचारांसाठी लढा दिला. त्यामुळे त्यांच्या छायाचित्राचा अवमान म्हणजे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रकार असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. संबंधित प्रवक्त्यांवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात शहरप्रमुख राजकुमार पाटील, उपशहरप्रमुख अशोक खोत, नितीन दळवी, मुकुंद नाळे, विजयराव पवार, शिवाजीराव पाटील, अक्षय साखळे, आकाश साखरे, रणजित आवटे, शिवराज खवरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी-माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि त्यांच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनातून शिवसैनिकांनी दिला.