आम.अशोकराव माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घोषित, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जनसुराज्य पक्षाकडून आभार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील संकटांची गांभीर्याने दखल घेत आमदार माने यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला.
या निर्णयाबद्दल राज्याचे महसूलमंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आणि आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हातकणंगले तालुक्याच्या वतीने तसेच आमदार माने यांच्या वतीने ही सदिच्छा भेट घेण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे असमान प्रमाण, पाणीटंचाई, पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि वाढता शेतीखर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणे हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
आमदार अशोकराव माने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ सभागृहातच नव्हे, तर प्रशासन आणि शासनाच्या पातळीवरही सातत्याने मांडले. जनतेच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यावर मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष, विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तत्परता, या कार्यपद्धतीतून आमदार अशोकराव माने यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घोषित होण्याचा निर्णय हा त्यांच्या पाठपुराव्याला मिळालेला महत्त्वपूर्ण विजय असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त होत आहे.