राजू शेट्टींनी पुन्हा कारखानदारांना चितपट केले! ६१ तासांचा चक्काजाम, शेतकऱ्यांची एकजूट; ऊसदराच्या लढ्यात कोल्हापूरच्या पैलवानाने मारले मैदान
शिरोळ | प्रतिनिधी
ऊसाच्या टिपरीसारखा निब्बर गडी, कृष्णा खोऱ्याचे पाणी पिऊन तयार झालेला पैलवान आणि कोल्हापूरचा अस्सल रांगडेपणा व निडरपणा नसानसांत भिनलेला लढवय्या नेता म्हणजे राजू शेट्टी! एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरले की मागे हटायचे नाही, हा त्यांचा स्वभाव. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कितीही मोठ्या ताकदीशी दोन हात करण्याची धमक त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा दाखवून दिली. ऊसदराच्या प्रश्नावर ६१ तासांचा चक्काजाम करून सरकार आणि साखर कारखानदारांना निर्णय घेण्यास भाग पाडत राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात बाजी मारली.
ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. कारखानदार आणि सरकार यांच्यातील समीकरणांमध्ये अनेकदा शेतकऱ्यांच्या घामाला अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची भावना आहे. कारखान्यांच्या चरख्यात ऊस उत्पादकांचा चोथा होतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे काम राजू शेट्टी यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या आंदोलनाची ताकद किती आहे, याचा प्रत्यय यंदाही आला.
मोठमोठ्या साखर कारखान्यांचे बॉयलर गाळप हंगामाच्या मध्यावर बंद पाडण्याची वेळ आणण्याचा इतिहास राजू शेट्टी यांच्या आंदोलनांनी यापूर्वी घडवला आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती यंदाच्या ऊसदराच्या आंदोलनातून झाली. १६ ऑक्टोबरला जरंडेश्वर येथे ऊसाला वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाची ठिणगी पडली. सुरुवातीला अवघे दोनशे शेतकरी सोबत होते. मात्र, या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आंदोलनात करण्याची किमया शेट्टी यांनी साधली. शेवटच्या टप्प्यात तब्बल ५० हजार शेतकऱ्यांचा गोतावळा एकत्र आला आणि सरकारसह साखर कारखानदारांचेही धाबे दणाणले.
या आंदोलनात राजू शेट्टी यांनी केवळ घोषणाबाजीवर समाधान मानले नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्षाची धार कायम ठेवली. शेतकऱ्यांचा वाढता सहभाग, ऊस वाहतुकीवरील परिणाम आणि ६१ तासांचा अखंड चक्काजाम यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. गाळप हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर निर्माण झालेल्या या परिस्थितीने कारखानदारांवर दबाव निर्माण केला. अखेर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याशिवाय पर्याय उरला नाही.
तब्बल ६१ तासांच्या संघर्षानंतर उसाच्या दराबाबत महत्त्वाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यामध्ये उसाची पहिली उचल प्रतिटन ३ हजार ९०० रुपये, हंगाम समाप्तीपूर्वी आणखी १०० रुपये आणि साखरेचे दर वाढल्यास अतिरिक्त २०० रुपये, असा एकूण ४ हजार २०० रुपयांचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव पुढे आला. या तोडग्यामुळे ऊसदराच्या आंदोलनाला महत्त्वाचे यश मिळाले.
या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला मर्यादित संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अखेर हजारोंच्या संख्येने एकत्र आणण्यात राजू शेट्टी यांना आलेले यश. शेतकऱ्यांच्या मनात असलेली अस्वस्थता, कारखानदारांविषयीची नाराजी आणि न्याय्य दरासाठीची धडपड यांना त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून संघटित ताकद दिली. ५० हजार शेतकऱ्यांची उपस्थिती ही केवळ संख्येची नव्हे, तर नेतृत्वावरील विश्वासाची पावती ठरली.
राजकारणात सत्ता, पदे आणि प्रतिष्ठा यापेक्षा सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी महत्त्वाची असते. राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड न करता संघर्ष करण्याची त्यांची भूमिका ऊस उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा, पैलवानाचा बाणा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी असलेली निष्ठा या जोरावर राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या लढ्यात पुन्हा एकदा मैदान मारले. कारखानदार कितीही मोठे असले, तरी शेतकऱ्यांची एकजूट त्यांच्यापेक्षा मोठी असते, हा संदेश या आंदोलनाने दिला. म्हणूनच हा विजय केवळ राजू शेट्टी यांचा नसून ऊस उत्पादकांच्या संघटित ताकदीचा विजय मानला जात आहे. संघर्षाचा हा पैलवान पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि विरोधकांना चितपट करूनच बाहेर पडला..!