६१ तासांच्या चक्काजामनंतर ऊसदराची कोंडी फुटली!कोल्हापुरात प्रतिटन ४,२०० रुपयांवर तोडगा; किणी टोलनाक्यावरील आंदोलन स्थगित
पहिली उचल ३,९०० रुपये, हंगामाअखेर १०० व पुढील हंगामापूर्वी २०० रुपये; कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा बंदचा निर्णयही मागे
किणी / प्रतिनिधी
ऊसदराच्या प्रश्नावर गेल्या ६१ तासांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कोल्हापुरातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर प्रतिटन ४,२०० रुपयांचा तोडगा निघाला. यामध्ये पहिली उचल ३,९०० रुपये, गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. या निर्णयानंतर स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावरील चक्काजाम आंदोलन स्थगित केले. तसेच आजचा (शुक्रवार, दि. ६) कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा बंदचा निर्णयही मागे घेण्यात आला.
उसाला पहिली उचल ४,५०० रुपये मिळाल्याशिवाय महामार्ग खुला होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. त्यानुसार ३ नोव्हेंबरपासून किणी टोलनाक्यावर आंदोलन सुरू होते. सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला होता. सलग तीन दिवसांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कोल्हापुरातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एसटीच्या तब्बल १६६ फेऱ्याही रद्द कराव्या लागल्या होत्या.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. चर्चेअंती कारखानदारांनी ३,८०० रुपये अधिक २०० रुपये असा प्रस्ताव मांडला होता. मात्र, शेतकरी संघटनेने ४,५०० रुपयांच्या मागणीवरून माघार घेत ४,२०० रुपयांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पहिली उचल ३,९०० रुपये देण्यासह उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे निश्चित झाले.
हा तोडगा साखरेचा प्रतिक्विंटल ४,५०० रुपये दर गृहीत धरून काढण्यात आला आहे. साखरेचा दर यापेक्षा वाढल्यास अतिरिक्त मिळकतीतील ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना आणि ३० टक्के हिस्सा कारखान्यांना देण्याचे सूत्रही निश्चित करण्यात आले आहे.
सांगली, साताऱ्यातही दराचा पॅटर्न राबवा
कोल्हापुरातील ऊसदराचा हा पॅटर्न सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही लागू करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा; अन्यथा त्या जिल्ह्यांत स्वतंत्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मध्यरात्री आंदोलन स्थगित झाल्याने तीन दिवसांपासून ठप्प असलेला पुणे-बंगळूर महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला आहे.