१०४ वर्षांच्या आईची माया! रात्री ३ वाजताही मुलाच्या स्वागतासाठी जागी; राजू शेट्टींचे औक्षण करून दिले आशीर्वाद
शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या लढ्याला यश मिळाल्याचा आईलाही अभिमान; संघर्षाच्या विजयावर मायेच्या आशीर्वादाची भावस्पर्शी किनार
शिरोळ / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हक्काच्या ऊसदरासाठी तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ संघर्ष करून विजय मिळवल्यानंतर घरी परतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांचे त्यांच्या १०४ वर्षांच्या आईने रात्री तीन वाजता जागे राहून प्रेमाने स्वागत केले. मुलाने शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद आणि अभिमान आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या प्रसंगाने संघर्षाच्या विजयाला मायेची भावस्पर्शी किनार लाभली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी राजू शेट्टी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाची धग कायम ठेवली होती. पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर तब्बल ६१ तास चक्काजाम आंदोलन करून सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधले. अखेर ऊसदराच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या लढ्याला मिळालेल्या यशानंतर राजू शेट्टी रात्री उशिरा घरी पोहोचले.
मात्र, रात्रीचे तीन वाजले असतानाही १०४ वर्षांची आई मुलाच्या स्वागतासाठी जागीच होती. मुलगा सुखरूप घरी परतल्याचा आनंद आणि त्याने शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाचा अभिमान या दोन्ही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आईने प्रेमाने मुलाची नजर काढली आणि त्याला आशीर्वाद दिले.
एका बाजूला हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय, तर दुसऱ्या बाजूला १०४ वर्षांच्या आईच्या मायेचा ओलावा! सार्वजनिक जीवनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या राजू शेट्टी यांच्या आयुष्यातील हा क्षण मात्र भावनांनी ओथंबलेला ठरला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मुलाच्या विजयाचा आनंद आईने आपल्या मायेने व्यक्त केला.