नागावमध्ये १२ हजारांची लाच घेताना दोघे जण रंगेहात जेोडीत; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
तलाठी कार्यालयातील ‘खासगी इसमांचे’ बिंग फुटले; स्वतःला ‘कोतवाल’ भासवणाराही जाळ्यात
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव (ता. हातकणंगले) येथील सामायिक जमिनीचे क्षेत्र दुरुस्त करून सातबारावर नाव नोंदवून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले. कथित कोतवाल अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, रा. नागाव) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. शिवाजी चौक, नागाव) अशी या लाचखोरांची नावे असून, यातील एकजण स्वतःला कोतवाल असल्याचे भासवून गावात वावरत होता. या प्रकरणी तलाठी मॅडम यांचे नाव आले असून ते सध्या फरार आहेत पोलिस त्यांचा शोध घेवून त्यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे . या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील एका ४० वर्षीय कारखानदार तक्रारदाराची मौजे नागाव येथे वडिलांजित जमीन आहे. त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीचे क्षेत्र नोंदवले गेले होते. हे क्षेत्र दुरुस्त करून योग्य क्षेत्र नोंदवण्यासाठी त्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयात अर्ज केला होता. तिथून हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी नागाव तलाठी कार्यालय येथे आले होते. तक्रारदाराने सातबारावर नाव लावण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रेही तलाठी कार्यालयात जमा केली होती.
तक्रारदार यानी कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता, तलाठी कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी तक्रारदाराला खासगी कत्ती कोतवाल अवधूत लोंढे याला भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने अवधूत लोंढेची भेट घेतली असता, “तलाठी मॅडम तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून सातबारा नोंदवण्याचे काम करणार आहेत, त्यासाठी मॅडम यांच्यासाठी १५ हजार रुपये लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.
या लाचेच्या मागणीनंतर तडजोडीअंती १२ हजार रुपयांत सौदा ठरला. त्यानुसार, आज नागाव येथील शिवाजी चौक परिसरात लाच स्वीकारत असताना
सुरज कुंतीनाथ सोळांकुरे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंच साक्षीदारांच्या समक्ष रंगेहात पकडले . अवधूत रामचंद्र लोंढे व सुरज कुंतीनाथ सोळांकुरे यानी संगनमताने लाचेची मागणी केली होती
लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या पडताळणीमध्ये, अवधूत लोंढे याने तलाठी यांच्याकडून काम पूर्ण करून देण्याच्या नावाखाली १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे, तर सुरज सोळांकुरे यानेही मध्यस्थी करून १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हि धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, पोलीस अंमलदार विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, संदीप पवार, वैभव खोत व प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली आहे. महसूल कार्यालयात घरोब्यासारखे वावरणारे खासगी एजंट व इसम कशा पद्धतीने कारभार हाताळतात, याचे बिंग या कारवाईमुळे फुटले असून परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
चौकट
तलाठी कार्यालयात कायमस्वरुपी कोतवाल असून देखील तलाठी मॅडम या कोतवालास जम्यात न धरता कथित कोतवाल अवधूत लोंढे याच्याकडून कार्यालयीन व खासगी कामकाज करून घेत होत्या त्यानी गावातील अनेक व्यक्तीकडून गैरव्यवहाराने पैसे उकळल्याचे गावात चर्चा सुरू आहेत . त्यानी गावातील जमिनीबाबत बेकायदेशीर चोरवाटेने केलेल्या कामाची चौकशी केली तर त्यांच्या कामाबाबत मोठे भांडाफोड प्रकरणे बाहेर येतील .
सुजल सोळांकुरे हा एक मेडिकल व्यवसायिक असून त्याचे शिवाजी चौकात स्वतःचे मेडिकल स्टोअर असून तो एक बागायतदार शेतकरी म्हणून गावात ओळख आहे पण शेती व मेडिकल या व्यवसायासह तो शेतीची खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो त्यातुनच त्याला उलट मार्गाने पैसा कमावण्याचा मार्ग सुचला असावा अशीही गावात चर्चा सुरू आहे .