मोटारसायकलची टेम्पोला धडक; डोक्याला गंभीर मार लागल्याने एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू!

Spread the love

शिरोळ-अर्जुनवाड मार्गावर भीषण अपघात; बोरगावच्या राहुल कुंभार यांचा जागीच मृत्यू!

उगारे मळ्याजवळ मोटारसायकलची टेम्पोला जोरदार धडक; डोक्याला गंभीर मार लागल्याने दुर्दैवी अंत

शिरोळ | प्रतिनिधी

शिरोळ-अर्जुनवाड मार्गावरील उगारे मळा परिसरात मोटारसायकल आणि चारचाकी टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बोरगाव येथील राहुल राजू कुंभार (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताच्या वृत्ताने परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी (ता. मिरज) येथील राम भोसले यांचा टाटा कंपनीचा झिप एक्सएल चारचाकी टेम्पो (क्रमांक एमएच १० सीआर २०६१) मिरजकडून शिरोळच्या दिशेने जात होता. त्याचवेळी राहुल कुंभार हे युनिकॉर्न मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच ०९ ईडी ९४२३) शिरोळहून मिरजच्या दिशेने जात होते. उगारे मळा परिसरात दोन्ही वाहनांची समोरासमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना मोटारसायकलची टेम्पोच्या चालकाच्या बाजूला जोरदार धडक बसली.

या भीषण धडकेत राहुल कुंभार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता पाहता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. याबाबत शिरोळ पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!