शिरोळ तालुका हादरला! दानोळीतील महेश ऊर्फ एम.डी.याची गोळ्या घालून निर्घृण हत्या ; गावच्या राजकारणात होता सक्रीय

Spread the love

दानोळीत भरदिवसा गोळीबार करून तरुणाचा खून; तीन गोळ्या झाडून हल्लेखोर पसार!

चांदोली वसाहतीजवळ थरार; दुचाकीवरून आलेल्या मास्कधारी दोघांचा पाठलाग करून हल्ला, उपचारापूर्वीच मृत्यू

दानोळी / प्रतिनिधी

दानोळी (ता. शिरोळ) येथे भरदिवसा गोळीबार करून ४२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. महेश बजरंग दळवी असे मृत तरुणाचे नाव आहे. दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील चांदोली वसाहतीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दळवी यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महेश दळवी यांचे चांदोली वसाहतीत घर आहे. सोमवारी सकाळी ते दानोळी येथून दुचाकीवरून आपल्या घराकडे जात होते. चांदोली वसाहतीच्या पहिल्या थांब्याजवळ दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. घराजवळील पहिल्या ओढ्याच्या परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पहिली गोळी झाडली.

गोळीबार होताच दळवी यांनी दुचाकी सोडून जीव वाचवण्यासाठी जवळच राहणाऱ्या गुरव यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, चेहऱ्यावर मास्क बांधलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत आणखी दोन गोळ्या झाडल्या. जीवाच्या आकांताने दळवी यांनी गुरव यांच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला. मात्र, हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घरातील मागील खोलीत रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गोळीबाराची माहिती मिळताच महेश यांचे भाऊ विजय दळवी आणि त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जयसिंगपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. हल्लेखोरांची ओळख, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचे इतर धागेदोरे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. भरवस्तीजवळ घडलेल्या या गोळीबारामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!