गोकुळ निवडणुकीत मुश्रीफांना मोठा धक्का; चिरंजीव नावीद पराभूत! सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची मुसंडी; महायुतीच्या गोटात खळबळ
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत धक्कादायक निकालाचे चित्र समोर येत असून, मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांना पराभवाचा धक्का बसला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मतमोजणीत आघाडी घेतल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. उपलब्ध निकालाच्या कलानुसार, समविचारी आघाडीचे १४, तर महायुतीचे ११ उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. महायुतीच्या नेत्यांनी विजयासाठी केलेली रणनीती आणि ठरावधारकांशी साधलेला संपर्क यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याचे प्राथमिक कलातून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ओबीसी गटातून निवडणूक लढविणारे नावीद मुश्रीफ पिछाडीवर पडल्याने मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मतमोजणी केंद्रावरील घडामोडींमुळे या निकालाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दिग्गजांना धक्का; सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
गोकुळची निवडणूक केवळ दूध संघाच्या सत्तेसाठी मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनली होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असताना सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. ठरावधारकांनी कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले, याची उत्सुकता मतमोजणीदरम्यान शिगेला पोहोचली होती. प्राथमिक निकालातून समविचारी आघाडीला मिळणारा प्रतिसाद महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे दोघेही सर्वसाधारण गटातून पिछाडीवर असल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. अनुभवी नेत्यांनाही ठरावधारकांनी धक्का दिल्याचे या निकालाच्या कलातून स्पष्ट होत आहे.
अंतिम निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
दरम्यान, मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांनंतर अंतिम निकालाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. समविचारी आघाडीची आघाडी कायम राहते की महायुती पुनरागमन करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या निवडणुकीतील हा कल जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारा ठरू शकतो. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच दोन्ही बाजूंचे संख्याबळ आणि सत्तेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.