माणगावच्या स्वरा हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा! विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा; आमदार डॉ. अशोकराव माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन; जलदगती न्यायालयाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती
हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील अल्पवयीन स्वरा उपाध्ये हिच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवावा, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फास्टट्रॅक न्यायालयाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याची माहिती देण्यात आली.
माणगाव येथे नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असताना घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कार्यक्रमावरून घरी परतणाऱ्या स्वरा उपाध्ये या अल्पवयीन मुलीची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे माणगावसह कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून कँडल मार्च काढला. या वेळी नागरिकांनी पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. माने यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
वेळेत न्याय मिळण्यासाठी विशेष प्रयत्नांची मागणी
स्वरा हत्येचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, न्यायप्रक्रियेला विलंब होऊ नये, यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. माने यांनी निवेदनात नमूद केले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी विधिज्ञांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशीही त्यांनी मागणी केली. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फास्टट्रॅक न्यायालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील पुढील शासनस्तरीय निर्णयाकडे माणगावसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकर), आमदार अमल महाडीक, समितदादा कदम, विजयसिंह माने (भैय्या) आणि सुहास राजमाने उपस्थित होते.
“माणगावची ही घटना काळजावर घाव घालणारी आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय पीडित कुटुंबाला व गावकऱ्यांना न्याय मिळणार नाही.राज्य सरकारने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून जलद गतीने कायदेशीर कार्यवाही करावी.
दलितमित्र डॉ. अशोकराव माने
(आमदार, हातकणंगले)