भक्त वनशेट्टींच्या श्रद्धेपोटी इचलकरंजीहून शिरोलीत आले काशिलिंग बिरदेव!
बारा वर्षांच्या न्यायालयीन खटल्यापासून सर्परूपातील दर्शनापर्यंतची आख्यायिका; पुलाची शिरोलीच्या ग्रामदैवताची अनोखी परंपरा
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील ग्रामदैवत काशिलिंग बिरदेव यांच्या आगमनाची आख्यायिका आजही ग्रामस्थांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते. इचलकरंजी येथील बिरदेव मंदिरात सुरू झालेली वनशेट्टी सोडगे यांच्या भक्तीची परंपरा पुढे शिरोलीत बिरदेवाच्या प्रतिष्ठापनेपर्यंत पोहोचली, अशी मान्यता आहे.
बारा वर्षे सुरू होता न्यायालयीन खटला
आख्यायिकेनुसार, सुमारे २०० ते २२५ वर्षांपूर्वी शिरोलीतील माळवाडी येथे वनशेट्टी सोडगे हे राहत होते. त्यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील खटला इचलकरंजी येथील न्यायालयात सुरू होता. त्या काळात प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने ते शिरोलीहून इचलकरंजीला पायी जात असत.
न्यायालयातील पहिल्या तारखेला इचलकरंजी येथे मुक्कामाची अडचण निर्माण झाल्याने त्यांना राजवाड्यासमोरील न्यायालयाजवळ असलेल्या बिरदेवाच्या मंदिरात आसरा मिळाला. तेथे रात्र घालवून दुसऱ्या दिवशी ते न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने पुढील तारीख महिन्यानंतर दिल्याने त्यांचे इचलकरंजीला जाणे सुरू राहिले.
मूठभर तांदळाचा नैवेद्य आणि नित्यनेमाची सेवा
मंदिरात वारंवार मुक्काम करत असताना आपण देवाची सेवा करावी, असे वनशेट्टी यांच्या मनात आले. त्यानंतर ते शिरोलीहून निघताना मूठभर भात सोबत घेत असत. वाटेत भात सोलून त्यातील तांदूळ वेगळे जमा करत आणि इचलकरंजीला पोहोचल्यानंतर मंदिरात मुक्काम करत.
सकाळी स्नान करून तीन दगडांची चूल मांडत, पुजाऱ्यांकडून भांडे घेऊन तांदळाचा भात शिजवत आणि त्याचा नैवेद्य बिरदेवाला अर्पण करत. दर्शन घेतल्यानंतर न्यायालयात जात आणि कामकाज संपल्यावर मंदिरात परत येऊन प्रसाद ग्रहण करत. अशा प्रकारे त्यांची सेवा तब्बल बारा वर्षे सुरू राहिली.
नवसाला पावला बिरदेव; खटल्याचा निकाल बाजूने
खटल्यामुळे संसाराचे मोठे नुकसान होत असल्याने वनशेट्टी यांनी बिरदेवाला साकडे घातले. आपल्या बाजूने निकाल लागल्यास आयुष्यभर दर महिन्याला दर्शनासाठी येत राहीन, असा नवस त्यांनी केला. काही काळानंतर खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. आनंदित झालेल्या वनशेट्टी यांनी कुटुंबासह इचलकरंजीला जाऊन बिरदेवाचे दर्शन घेतले आणि नवस पूर्ण करण्याचा निर्धार केला.
त्यानंतर ते नियमितपणे दर महिन्याला पायी इचलकरंजीला जाऊन दर्शन घेऊ लागले. मात्र, वाढते वय आणि प्रवासाचे कष्ट पाहून बिरदेवानेच त्यांच्या भक्तीची दखल घेत शिरोलीत येण्याचे ठरवले, अशी आख्यायिका आहे.
कपिला गायीच्या माध्यमातून सर्परूपात दर्शन
बिरदेवाने वनशेट्टी यांना सांगितले की, आता त्यांनी दर्शनासाठी इचलकरंजीला येण्याचे कष्ट करू नयेत; आपणच त्यांच्या गावी येणार आहोत. मात्र, देव आल्याचे कसे ओळखायचे, असा प्रश्न वनशेट्टी यांनी विचारला.
त्यावेळी देवाने त्यांना एक खूण सांगितली. रात्री बारा वाजता त्यांची वांझ असलेली कपिला गाय आपोआप दाव्यातून सुटून हंबरत धावू लागेल. तिच्या मागे जावे. ज्या ठिकाणी गाय थांबेल आणि तिला पान्हा फुटेल, त्या ठिकाणी सर्परूपात येऊन आपण तिचे दूध प्राशन करू. हे दृश्य दिसल्यावर आपणच तेथे आल्याचे समजावे आणि त्या जागी आपली प्रतिष्ठापना करावी, असे बिरदेवाने सांगितले.
बिरदेवाबरोबर मसोबाचेही शिरोलीत आगमन
आख्यायिकेनुसार, बिरदेवाने शिरोलीत येण्याचे ठरवले, त्यावेळी काकडे गावातील अंतर्यामी मसोबा देवानेही त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह धरला. दोन्ही देव शिरोलीत आले. बिरदेवाने गावात वास्तव्य करण्याचे ठरवले, तर मसोबाला गावाच्या वेशीबाहेर थांबण्यास सांगितले. आज राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस असलेले मसोबा मंदिर या परंपरेशी जोडले जाते.
श्रावणातील चमत्काराने ग्रामस्थांचा विश्वास दृढ
बिरदेव शिरोलीत आले आहेत, असे वनशेट्टी यांनी ग्रामस्थांना सांगितले; मात्र सुरुवातीला त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. त्यानंतर बिरदेवाने श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी आपले अस्तित्व दाखवून देण्याचे आश्वासन दिले.
त्या दिवशी ग्रामस्थ घोडेगिरी या ग्रामदैवताच्या पूजेसाठी आंबील आणि नैवेद्य घेऊन एकत्र आले असताना, त्यांच्या हातातील नैवेद्य व आंबीलच्या घागरी खाली पडून विधी विस्कळीत झाल्याचे आख्यायिकेत सांगितले जाते. या घटनेने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्यानंतर वनशेट्टी यांनी सर्वांना तलावाकाठी नेले आणि बिरदेवाला दर्शन देण्याची विनंती केली.
तेव्हा बिरदेवाने सर्परूपात सर्व शिरोलीकरांना दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांचा बिरदेवाच्या अस्तित्वावर विश्वास बसला आणि त्यांनी त्यांना गावचे ग्रामदैवत म्हणून स्वीकारले.
मंदिराची उभारणी आणि आजही सुरू असलेली परंपरा
बिरदेवाचे दर्शन झाल्याचे मानले जाणाऱ्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढे तेथे मंदिर उभारण्यात आले आणि नियमित पूजा-अर्चा सुरू झाली. सण-उत्सवांच्या वेळी बिरदेवाला नैवेद्य व नारळ अर्पण करण्याची परंपरा रूढ झाली.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस पहाटे पाच वाजता, सकाळी आठ वाजता, सायंकाळी सात वाजता आणि रात्री बारा वाजता आरती केली जाते. खंडेनवमीला भाकणूक व हेडाम हे पारंपरिक विधी होतात. दसऱ्याच्या दिवशी मसोबाची पालखी बिरदेव मंदिरात येते. दोन्ही देवतांची भेट झाल्यानंतर सोने लुटण्याच्या दिवशी बिरदेवाची पालखी गावातून मिरवणुकीने दसरा मैदानाकडे जाते.
वनशेट्टी सोडगे यांच्या भक्तीपासून सुरू झालेली ही आख्यायिका आजही पुलाची शिरोलीतील ग्रामस्थांच्या श्रद्धेचा, धार्मिक परंपरेचा आणि गावाच्या सांस्कृतिक एकतेचा महत्त्वाचा भाग मानली जाते.