आयोगाच्या अध्यक्षांना हटवूनच न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा; सरकारवर सडकून टीका

Spread the love

पुणे / प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे, शिवराज मोरे यांच्यासह आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी पाटील यांनी राज्य सरकारवर आक्रमक शब्दांत टीका करत, “आयोगाच्या अध्यक्षांना हटवल्याशिवाय न्यायालयीन चौकशीला कोणताही अर्थ नाही,” अशी भूमिका मांडली.

MPSCच्या माध्यमातून राज्याची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये, असे सांगत पाटील म्हणाले की, या पिढीसोबत राज्याचे मुख्यमंत्री सुडबुद्धीने का वागत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री नेहमी वैधानिक आणि घटनात्मक भाषेत भूमिका मांडतात. मात्र, सचिवांची बदली केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.सचिवांची बदली आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा म्हणजे सरकारकडून चूक झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आहे, असा दावा त्यांनी केला.

सरकारने जर चौकशीची घोषणा केली असेल, तर आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. अध्यक्ष पदावर कायम असताना त्यांच्याच कार्यकाळातील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी निष्पक्षपणे कशी होणार? असा सवाल करत त्यांनी सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला.

“अध्यक्षांना पदावर ठेवून केली जाणारी न्यायालयीन चौकशी हा केवळ फार्स ठरेल. त्यामुळे प्रथम आयोगाच्या अध्यक्षांना हटवावे आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करावी,”अशी ठाम मागणी पाटील यांनी केली.

MPSC ही केवळ परीक्षा घेणारी संस्था नसून महाराष्ट्रातील सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांची अस्मिता आणि त्यांच्या भवितव्याचा आधार आहे. आयोगाची विश्वासार्हता टिकविण्याची जबाबदारी सरकारची आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून ही विश्वासार्हता धोक्यात आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही सरकारने तातडीने मान्य कराव्यात. विद्यार्थ्यांचा हा लढा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी व्यवस्थेसाठी आहे.या लढाईत विद्यार्थ्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभे राहू, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!