कोल्हापूरच्या आराध्या चव्हाणची राष्ट्रीय रोइंगमध्ये ऐतिहासिक झेप!, अंडर-१५ गटात रौप्यपदकाची कमाई; महाराष्ट्राच्या मुलींची दमदार कामगिरी

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

कोलकाता येथे दि. ५ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या सब ज्युनिअर नॅशनल रोइंग चॅम्पियनशिपमध्ये देशातील १९ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत एकूण ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या या उल्लेखनीय कामगिरीत आराध्या पाटील,आराध्या नाईक

तनिशी कोटणाला यांनी सहभाग घेतला त्यामध्ये कोल्हापूरची कन्या आराध्या सचिन चव्हाण हिने अंडर-१५ गटात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले.

आराध्याने अत्यंत चुरशीच्या राष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. देशभरातून सहभागी झालेल्या गुणवान खेळाडूंमध्ये आपल्या खेळाचे कौशल्य सिद्ध करत तिने रौप्यपदकावर नाव कोरले. तिच्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आराध्याच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आराध्या हिला कुशप्रीत सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहनामुळे स्पर्धेत आत्मविश्वासाने आराध्याला राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करता आली.

महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत केलेली सात पदकांची कमाई ही राज्याच्या रोइंग क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. विशेषतः कोल्हापूरच्या आराध्या चव्हाणने मिळवलेले रौप्यपदक हे तिच्या भविष्यातील उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीची नांदी मानली जात आहे.

आराध्याच्या या यशाबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि कोल्हापूरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आराध्याने अनेक युवा खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!