रुई येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; आमदार अशोकराव माने यांची घटनास्थळी धाव कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश

Spread the love

रुई / प्रतिनिधी

रुई (ता. हातकणंगले) येथे दड्डे व हुल्ले परिवाराच्या घराला शॉर्टसर्किटमुळे दुर्दैवी आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने (बापू) यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी आग लागलेल्या घराची पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.आगीच्या घटनेमुळे दड्डे व हुल्ले परिवाराचे मोठे नुकसान झाले असून, या कठीण प्रसंगी कुटुंबीय मानसिक तणावाखाली आहेत. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार अशोकराव माने यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. नुकसानाची योग्य नोंद घेऊन शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिले.यावेळी बोलताना आमदार माने यांनी, नैसर्गिक अथवा आकस्मिक संकटाच्या काळात नागरिकांना आधार देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ती मदत उपलब्ध करून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगितले. संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच खऱ्या अर्थाने लोकसेवेचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या वेळी अभय कुमार काश्मिरे, स्वीय सहायक सुहास राजमाने, अभिषेक पाटील, सुभाष चौगुले, महावीर हुल्ले, प्रशांत हुल्ले, अजित खुळ, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही दड्डे व हुल्ले परिवाराला मदतीचा हात देत धीर दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!