पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि शिक्षणमहर्षी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने देशाने दूरदृष्टीचा शिक्षणतज्ज्ञ, लोकाभिमुख समाजसेवक आणि कुशल प्रशासक गमावला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी कार्याची सुरुवात केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या १८० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि सातपेक्षा अधिक नामांकित विद्यापीठांमधून लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.
राजकारणातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत कोल्हापूरचे महापौर, तीन वेळा आमदार तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि लोकाभिमुख कार्यशैलीचा सर्वत्र गौरव झाला.
आरोग्य क्षेत्रातही त्यांनी अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी करून लाखो गरजू रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देत त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानालाही विशेष महत्त्व आहे. नवी मुंबई येथे उभारलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डी. वाय. पाटील स्टेडियम’ हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. या स्टेडियममुळे देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांना व्यासपीठ मिळाले.
शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशभरात मानाचे स्थान निर्माण केले.
डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असून, त्यांच्या कार्याचा वारसा समाजाला दिशा देत राहील. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे