पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र सण ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरोली येथे बुधवारी अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांप्रती आदर, पालकांप्रती कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता सरस्वतीमातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा बाटे व चेअरमन संतोष बाटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची केलेली पाद्यपूजा होय. चिमुकल्यांनी पालकांचे पाय धुऊन त्यांना टिळा लावला, पुष्प अर्पण केले, मिठाई भरवून त्यांचे आशीर्वाद घेतले. या भावनिक आणि संस्कारमय उपक्रमातून “आई-वडील हेच पहिले गुरु” हा मोलाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थित पालकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व अधोरेखित करणारी गीते, कविता, भाषणे आणि श्लोक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु…” या मंत्रोच्चाराने संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे देऊन त्यांचे पूजन करत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व समजावून सांगत जीवनात गुरुजनांचा सन्मान आणि पालकांचा आदर कायम राखण्याचे आवाहन केले. अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मतही व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी उपमुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील तसेच पुनम बागी, सारिका काळे, तस्निम मुजावर, उमा सनदे, नयनतारा लंबे, प्रियांका गेळे, निकिता कांबळे, सायली चौगुले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.