शगुन कास्टिंगचा मालवाहू टेम्पो पुलाची शिरोली येथे पलटी; वाहतूक कोंडीनंतर परिस्थिती सुरळीत

Spread the love

पुलाची शिरोली | प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुणे–बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील सांगली फाटा उड्डाणपुलावर शुक्रवारी शगुन कास्टिंगचा मालवाहू टेम्पो पलटी झाल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकासह अन्य कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच 14 डी – एम-13-25 क्रमांकाचा मालवाहू टेम्पो शगुन कास्टिंगमधून माल भरून कागल येथील कस्तुरी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे निघाला होता. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा उड्डाणपुलावरून जात असताना टेम्पोचा कमानपाटा अचानक तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.पण टेंपो चालका राकेश पांढरबळे यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही किंवा कोणत्याही वाहनांचे नुकसान झाले नाही.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. टेम्पो रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारत क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला हलविला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

अपघातामुळे टेम्पोचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी घटनेची आवश्यक नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. महामार्गावरून अवजड व मालवाहू वाहने चालविताना वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी करणे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!