आषाढी एकादशी निमित्त ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भक्तिमय दिंडी उत्साहात

Spread the love

पुलाची शिरोली | प्रतिनिधी : कुबेर हंकारे

संभाजी दत्तू बाटे एज्युकेशन सोसायटी संचालित ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल, पुलाची शिरोली येथे आषाढी एकादशीचा पावन उत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीभावाची जपणूक व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी दिंडी’ उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. मनीषा बाटे आणि संस्थेचे अध्यक्ष संतोष बाटे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे पूजन करून झाली. त्यानंतर शाळेच्या परिसरातून टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “जय हरी विठ्ठल”, “विठ्ठल विठ्ठल”च्या नामघोषात दिंडी काढण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक वारकरी वेश परिधान केला होता. मुलींनी नऊवारी साडी, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात टाळ घेऊन वारकरी परंपरेचे दर्शन घडवले, तर मुलांनी पांढरा सलवार-कुर्ता, वारकरी टोपी आणि भगवे झेंडे हातात घेऊन दिंडीत सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई आणि संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत साकारलेली रूपे विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, भारूड, वारकरी नृत्य तसेच भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षिकांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिरसात रंग भरला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. वारी परंपरा, संतांचे विचार आणि भक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, धार्मिक मूल्ये आणि सामाजिक एकात्मतेचे संस्कार रुजण्यास निश्चितच हातभार लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्या प्रतिक्षा पाटील यांच्यासह पुनम बागी, सारिका काळे, उमा सनदे, नयनतारा लंबे, प्रियांका गेळे, निकिता कांबळे आणि सायली चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!