शिरोळ | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुंथुगिरी (आळते) व बाहुबली कुंभोज या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीची बैठक सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
श्री क्षेत्र कुंथुगिरी, आळते येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पंचकल्याण महामहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकास आराखड्याला गती मिळावी, यासाठी आमदार डॉ. माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत शासनाने उच्चाधिकार समितीची बैठक बोलावली असून, या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरील प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, सकारात्मक निर्णय होऊन लवकरच आराखड्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आमदार डॉ. अशोकराव माने यांनी व्यक्त केला. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, निवास व्यवस्था, सुशोभीकरण तसेच इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून, देशभरातून येणाऱ्या जैन भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कुंथुगिरी, आळते व बाहुबली कुंभोज या तीर्थक्षेत्रांचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठा विकास होईल. त्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच परिसराच्या आर्थिक प्रगतीलाही नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याबद्दल आमदार डॉ. अशोकराव माने यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला लवकरच अंतिम मान्यता मिळून तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.