राजापूर बंधाऱ्यावर कृष्णा नदीत उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात ‘वजीर रेस्क्यू फोर्स’ला यश

Spread the love

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर घडलेल्या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्पर कामगिरी

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर कृष्णा नदीत उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यरत असलेल्या ‘वजीर रेस्क्यू फोर्स’च्या जवानांना यश आले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने हालचाली करत शोधमोहीम राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर बंधाऱ्यावर सायंकाळी एका महिलेने अचानक कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटलांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधत मदतकार्य सुरू केले.यानंतर आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असलेल्या ‘वजीर रेस्क्यू फोर्स’ला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच रेस्क्यू फोर्सचे जवान आवश्यक जीवरक्षक साहित्य घेऊन राजापूर बंधाऱ्यावर दाखल झाले. नदीतील पाण्याचा प्रवाह, खोली आणि परिस्थितीचा अंदाज घेत जवानांनी तातडीने शोधकार्य सुरू केले.काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने नदीपात्रातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, संबंधित महिलेने नेमक्या कोणत्या कारणातून नदीत उडी घेतली, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे नदीकाठच्या परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अशा ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देत बचावकार्य पूर्ण करणाऱ्या ‘वजीर रेस्क्यू फोर्स’च्या जवानांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!