नागांवमध्ये एकाच रात्री तीन घरांवर दरोडा ११ तोळे सोन्यासह चांदी रोख रकमेसह लाखांचा मुद्देमाल लंपास चोरटे सिसिटिव्हीत कैद 

Spread the love

नागांवमध्ये एकाच रात्री तीन घरांवर दरोडा ११ तोळे सोन्यासह चांदी रोख रकमेसह लाखांचा मुद्देमाल लंपास चोरटे सिसिटिव्हीत कैद

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

नागांव ता. हातकणंगले येथील शिवाजी नगर माळवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच गल्लीतील तीन घरांचे कडीकोयंडे उचकटून सुमारे १३ते१५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये ११ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांची संख्या पाच ते सहा असल्याचे दिसून येत आहे.धक्कादायक बाब म्हणजे, चोरी झालेल्या घरांमध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घराचाही समावेश आहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पोवार यानी भेट देऊन घटनेची पहाणी केली .

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी माळवाडी भागातील तीन बंद घरांना लक्ष्य केले. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बाबर यांचे कुटुंबीय येथे राहतात. नितीन बाबर याना येण्यास रात्री उशीर होणार असल्यामुळे आई वडीलांची झोपमोड होऊन त्रास होऊ नये म्हणून त्यानी घरास कुलुप लावून चावी खिडकीत ठेवून वरच्या मजल्यावर झोपण्यास सांगितले त्यानुसार आई-वडीलानी घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले . मात्र, कामानिमित्त नितीन बाबर यांना गावी येण्यास उशीर झाला म्हणून ते आले नाही त्याच दरम्यान, चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील ११ तोळे सोने, सहा भार चांदी आणि रोख ७ हजार रुपये असा ऐवज चोरून नेला.

तर चोरट्यांनी याच गल्लीतील सागर सदाशिव सावंत यांच्या टेलरिंग व किराणा मालाच्या दुकानाचेही कुलूप तोडले. त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याशिवाय, बाबासो सावंत यांच्याही घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, पाच ते सहा चोरटे हालचाली करताना दिसत आहेत. तपासासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. स्टेला या श्वानाने घटनास्थळी काही अंतरापर्यंत माग काढला, मात्र तो गल्लीतच घुटमळले. शिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!