“टाकळी एमआयडीसी आणि राधाकृष्ण पाणी योजना रद्द करा”; सैनिक टाकळीत बेमुदत उपोषण सुरू, शेतकरी-आजीमाजी सैनिकांचा आक्रमक एल्गार
सैनिक टाकळी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील सुपीक जमीन, पाणी आणि सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेचे रक्षण करण्यासाठी गुरुवार (दि.९ जुलै) रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सैनिक टाकळी येथील अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ झाला. “सैनिक वाचवा, शेतकरी वाचवा… जय जवान, जय किसान” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रस्तावित टाकळी एमआयडीसी आणि इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित दानवाड येथील राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना तातडीने रद्द करण्याची ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेला धक्का देणारी एमआयडीसी कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. भागाचा विकास करायचाच असेल तर मागणीनुसार सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि केंद्रीय विद्यालय सुरू करावे, तसेच गावचे गायरान गावाच्या विकासासाठी राखीव ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतही तीव्र भूमिका मांडली. यापूर्वी कुरुंदवाड येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला असताना आता दानवाड संगमातून शिरोळ तालुक्याच्या हक्काचे पाणी वळविण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला. इचलकरंजी शहरासाठी जवळची पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून त्यातूनच पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
“रद्द करा… रद्द करा… टाकळी एमआयडीसी आणि राधाकृष्ण पाणी योजना रद्द करा,” अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनाला सैनिक टाकळीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, आजी-माजी सैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाहीर पाठिंबा देत आहेत . त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढली असून प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.