हेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोकादायक पातळी गाठली असून पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पंचगंगेच्या पाण्याने हेरवाड-अब्दुललाट मार्ग जलमय झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग पुढील काही काळ पूर्णपणे बंद ठेवावा लागू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.चार दिवस सलग पावसामुळे पंचगंगेसह कृष्णा, वारणा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तेरवाड, शिरोळ आणि राजापूर येथील बंधारे पाण्याखाली गेले असून महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणाऱ्या अनेक संपर्क मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कुरुंदवाड-शिरढोण मार्गासह हेरवाड-अब्दुललाट रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे.पूरामुळे दोन्ही राज्यांतील दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण असून नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी करत आहेत.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त भागांवर बारकाईने लक्ष ठेवले असून महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच पूरग्रस्त रस्ते, बंधारे किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.