कोल्हापूर / दिलीप शिरढोणे
शासनाच्या अन्यायी धोरणांविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खाजगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक-शिक्षिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र आक्रोश व्यक्त केला.प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही एक दिवसाची रजा टाकून शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या विराट मोर्चामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता.
दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात
शिक्षक संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक येथून या भव्य मोर्चाची सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक आणि सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत हजारो शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दसरा चौकातून निघालेला हा विराट मोर्चा बसंत बहार टॉकीज आणि उद्योग भवन मार्गे सर्वप्रथम जिल्हा परिषदेवर धडकला. तिथे प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावरही शिक्षकांनी जोरदार निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले.
शिक्षकांच्या मुख्य मागण्या
मोर्चामध्ये शिक्षकांनी शासनाच्या विविध जाचक अटी आणि धोरणांचा तीव्र निषेध केला. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे होत्या:
संचमान्यता जी.आर. रद्द करा: १५ मार्च २०२४ रोजी काढण्यात आलेला जाचक संचमान्यता जी.आर. त्वरित रद्द करण्यात यावा.
टीईटी (TET) सक्ती मुक्तता: शिक्षकांवरील टीईटीची सक्ती रद्द करण्यात यावी.अशैक्षणिक कामे बंद करा: शिक्षकांवर लादली जाणारी ‘बीएलओ’ (BLO), ‘एसआयआर’ (SIR) यांसारखी अशैक्षणिक कामे तातडीने बंद करून त्यांना केवळ अध्यापनाचे काम करू द्यावे.
उपक्रमांचा भडीमार थांबवा: शाळांमध्ये सुरू असलेला विविध उपक्रमांचा अतिरिक्त भडीमार बंद करून शिक्षणाला न्याय द्यावा.पदोन्नतीतील अन्याय दूर करा: शिक्षकांच्या पदोन्नतीमधील अन्याय दूर करून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवावी.
वेतन अनुदान आणि पेन्शन: मनपा शिक्षकांना १००% वेतन अनुदान मंजूर करावे आणि सर्व शिक्षकांसाठी ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी.
शिक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
या मोर्चामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खाजगी अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षिका हजारोच्या संख्येने एकत्र आल्या होत्या. “शिक्षकांना न्याय द्या”, “अशैक्षणिक कामे बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर परिसर निनादला होता. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक प्रतिनिधींनी या वेळी दिला.