विजेच्या आर्थिंग वायरचा स्पर्श; शेतात काम करताना अब्दुललाट येथे तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह पाहून वडिलांचा हंबरडा
अब्दुललाट / प्रतिनिधी
अब्दुललाट येथील शेतात तण काढण्याचे काम करत असताना विजेच्या आर्थिंग वायरचा हाताला स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.९) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेमुळे अब्दुललाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सम्मेद बाळासो गिरमल (वय ३४) हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते.शेताच्या बांधावरील वाढलेले तण खुरप्याने काढत असताना त्यांचा हात शेतातील विद्युत आर्थिंग वायरला लागला.विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.दरम्यान, बराच वेळ उलटूनही मुलगा घरी परतला नसल्याने त्यांचे वडील चिंतेत पडले. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजारच्या शेतातील एका शेतकऱ्याशी संपर्क साधून पाहणी करण्यास सांगितले. संबंधित शेतकरी घटनास्थळी पोहोचला असता सम्मेद गिरमल हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने त्यांच्या वडिलांना याची माहिती दिली.घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणचे सहाय्यक अभियंता अभिजीत लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणाची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे गिरमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.