शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ शहरातील जिल्हा परिषद शाळांच्या प्रस्तावित एकत्रीकरणाच्या निर्णयाविरोधात पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे सुरू असलेल्या छत्रपती ताराराणी कन्या विद्या मंदिर व राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक १ या शाळा एकत्र करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा देत निर्णय मागे न घेतल्यास मोर्चा, ठिय्या आंदोलन आणि तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून शासनाच्या ७ ऑक्टोबर २०२५ च्या निर्णयानुसार एकाच कॅम्पसमधील दोन किंवा अधिक जिल्हा परिषद शाळांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरोळमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेली अनेक दशके मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण देणारी ताराराणी कन्या विद्या मंदिर आणि शंभर वर्षांची परंपरा असलेली राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक १ या दोन्ही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, पटसंख्या आणि निकाल समाधानकारक असताना प्रशासनाकडून एकत्रीकरणाचा विचार होत असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन देत, “शाळेचे समायोजन कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
दरम्यान, पी.एम. श्री शाळेतील शिक्षकांना कमी पटसंख्येचे कारण पुढे करत इतर शाळांमध्ये कामगारीवर पाठविण्याच्या प्रस्तावालाही समितीने विरोध दर्शविला आहे. पी.एम. श्री योजनेअंतर्गत विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपलब्ध शिक्षकांची संख्या आधीच अपुरी असल्याने आणखी शिक्षक कमी करणे विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
“सरकारी शाळा वाचवा”चा नारा देणारे शासन एकीकडे शाळा एकत्रीकरण आणि शिक्षक समायोजनाचा निर्णय घेत असेल, तर तो सरकारी शिक्षण व्यवस्थेला कमकुवत करणारा ठरेल, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. प्रशासनाने निर्णय तातडीने मागे न घेतल्यास पालक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.