पंचगंगेचा इशारा! कुरुंदवाड – शिरढोण पूल पाण्याखाली; इचलकरंजी मार्ग बंद, वाहतूक वळवली

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पूरस्थिती गंभीर बनत आहे.पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड–शिरढोण पुलावर पाणी आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कुरुंदवाड ते शिरढोण मार्गे इचलकरंजीकडे जाणारा मुख्य मार्ग तातडीने वाहतुकीसाठी बंद केला आहे.

या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक अब्दुल लाट – जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंचगंगेच्या पात्रातून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने पुलावरून मोटरसायकल, चारचाकी वाहने तसेच पायी जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कुरुंदवाड, शिरढोण आणि परिसरातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच नागरिक दररोज इचलकरंजी शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी ये-जा करतात. मात्र हा महत्त्वाचा संपर्क मार्ग बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने प्रवासाचे अंतर वाढले असून वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे.

हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नदीच्या पाणीपातळीत होणाऱ्या बदलांवर बारकाईने निरीक्षण केले जात आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!