भर पावसात भररस्त्यात महिलेची कोयत्याने हत्या,घरगुती वादातून प्रकाराचा संशय; पतीवर संशय, पोलिसांचा तपास सुरू

Spread the love

पेठवडगाव / प्रतिनिधी 

पेठवडगाव शहरातील एस.टी. स्टँडच्या पाठीमागील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर बुधवारी (दि.८) दुपारी साडेचारच्या सुमारास भर पावसात एका महिलेची धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अमृता दीपक कांबळे (रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पतीवर संशय असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भररस्त्यात झालेल्या हल्ल्यात अमृता कांबळे यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. भर पावसात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे यांच्यासह आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत व कुलदीप मोहिते यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला.दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून रक्ताचे नमुने व अन्य पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरगुती वादाची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या हत्याकांडामुळे पेठवडगाव शहर हादरले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!