अतिवृष्टीमुळे शिये,भुये, हालोंडी आणि पुलाची शिरोली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका शिये, भुये, हालोंडी आणि पुलाची शिरोली या गावांना बसू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, नागरिकांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केले आहे.जिल्ह्यात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणांची सध्याची स्थिती पाहता, मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धरणे कोणत्याही क्षणी पूर्ण भरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यापूर्वीच प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. करवीर तालुक्यातील शिये व भुये, तर हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि हालोंडी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पुरामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह इतर महत्त्वाचे मार्ग बंद होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन, दक्षिण भारतातील कर्नाटक व गोव्याकडे जाणारी आणि तिथून येणारी अवजड वाहने व इतर वाहतुकीच्या पार्किंगसाठी कागल औद्योगिक वसाहत आणि संभापूर (जे पी पार्क) येथील सुरक्षित ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. प्रवाशांनी व वाहनचालकांनी प्रवास करताना रस्त्यावरील पाण्याची रस्त्यावरील स्थितीचा अंदाज घेऊनच, अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन  पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!