नृसिंहवाडी | प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज (मंगळवार, दि. ७) पहाटे साडेतीन वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे हा धार्मिक सोहळा पार पडताच हजारो भाविकांनी श्री गुरुदेव दत्तांच्या जयघोषात पवित्र स्नान करून दर्शनाचा लाभ घेतला.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आला आहे. सोमवारी सायंकाळीच नदीचे पाणी श्री दत्त मंदिर परिसरात पोहोचले होते. रात्रीभर पाण्याची पातळी सुमारे पाच फूट वाढल्याने पहाटे ३.३० वाजता चालू मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.
दक्षिण द्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित होताच सांगली, कोल्हापूर तसेच परिसरातील विविध भागांतून भाविकांनी नृसिंहवाडीकडे धाव घेतली. विशेषतः महिला भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या अखंड नामघोषाने दुमदुमून गेला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली असून तिची आकर्षक फुलांची सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
दक्षिण द्वार सोहळ्याला दत्त संप्रदायात विशेष धार्मिक महत्त्व आहे. या वेळी उत्तरेकडून वाहणारे कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चरणकमलावरून दक्षिण द्वारात प्रवेश करते. या पवित्र क्षणी स्नान करून श्रींचे दर्शन घेणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे या सोहळ्याचे वृत्त समजताच सकाळपासून हजारो भाविकांनी नृसिंहवाडीत गर्दी केली असून मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळत आहे.