‘विनाअपघात सेवा हीच खरी चालकाची ओळख’ – अनिलराव यादव,२७ वर्षांची विनाअपघात सेवा पूर्ण करून एसटी चालक बाबासाहेब जमादार सेवानिवृत्त

Spread the love

‘विनाअपघात सेवा हीच खरी चालकाची ओळख’ – अनिलराव यादव,

 

२७ वर्षांची विनाअपघात सेवा पूर्ण करून एसटी चालक बाबासाहेब जमादार सेवानिवृत्त

 

कुरुंदवाड आगारात सत्कार समारंभ

शिरोळ / प्रतिनिधी 

 प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तब्बल २७ वर्षे विनाअपघात सेवा बजावून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुरुंदवाड आगारातील चालक बाबासाहेब (बाबासो मुसा) जमादार हे ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करण्यासाठी कुरुंदवाड आगारात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी बाबासाहेब जमादार यांच्या कार्याचा विशेष गौरव करताना म्हणाले की,विनाअपघात २७ वर्षे एसटी चालविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.चालकाच्या हातात शेकडो प्रवाशांचे प्राण सुरक्षित असतात.अशा जबाबदारीची जाणीव ठेवून सेवेत कोणतीही त्रुटी न ठेवता कर्तव्य बजावणारे बाबासाहेब जमादार हे सर्व चालकांसाठी प्रेरणादायी आहेत.त्यांच्या कार्याचा प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला अभिमान वाटला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाड आगार प्रमुख बिस्मिल्ला मुमताज कादर सय्यद या होत्या.त्यांनी अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब जमादार यांच्या सेवेचा गौरव करताना त्यांच्या शिस्तप्रिय,संयमी आणि जबाबदार कार्यपद्धतीचे कौतुक केले.निवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

सन १९९९ मध्ये कुरुंदवाड एसटी आगारात चालक म्हणून रुजू झालेल्या बाबासाहेब जमादार यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात सुरक्षित वाहनचालक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.सलग २७ वर्षे कोणताही अपघात न घडविता त्यांनी हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचविले.सेवाकाळात वेळेचे काटेकोर पालन,प्रवाशांशी नम्र वर्तन, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यामुळे ते सहकारी कर्मचाऱ्यांमध्येही आदराचे स्थान मिळवू शकले.

नोकरीसह कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी सामान्य नागरिकांच्या सेवेत कोणताही खंड पडू दिला नाही. पाऊस, उन्हाळा, थंडी किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, प्रवाशांची सेवा हीच आपली जबाबदारी मानून त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यांची कारकीर्द ही नवोदित चालकांसाठी आदर्शवत ठरली आहे.

यावेळी कुरुंदवाड आगार कामगार संघटनेच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब जमादार व त्यांच्या पत्नींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सेवेला मानवंदना दिली.

समारंभास उदगाव जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सानिका अजय पाटील-यड्रावकर, यड्राव बँकेचे चेअरमन अजय राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, खादी ग्रामोद्योग संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा निनाद भोसले, माजी नगरसेवक पंडित काळे यांनी उपस्थित राहून बाबासाहेब जमादार यांचा सत्कार केला व त्यांच्या सेवेचा गौरव केला.

तसेच वाहतूक निरीक्षक सद्दाम शेरकर, वाहतूक निरीक्षक संतोष चव्हाण, लेखाधिकारी सौ. स्नेहल देशमुख, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अक्षय आठवले, सचिव किशोर शिंगाडे, कामगार संघटनेचे नेते निनाद भोसले, अशपाक नालबंद, संतोष कांबळे, स्वप्नील कोळी यांच्यासह आगारातील अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एसटी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेडबाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात बाबासाहेब जमादार यांच्या सेवाप्रवासाचा आढावा घेतला.त्यांनी जमादार यांच्या कर्तव्यनिष्ठ स्वभावाचा, सहकाऱ्यांशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांचा आणि प्रवाशांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे खजिनदार माणिक थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

समारंभादरम्यान अनेक सहकाऱ्यांनी बाबासाहेब जमादार यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.शांत,संयमी,वेळेचे भान राखणारे आणि जबाबदारीने वाहन चालविणारे चालक म्हणून त्यांनी आगारात वेगळी छाप निर्माण केली.त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे आगारातील एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष चालक सेवेतून निवृत्त झाला असला,तरी त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढीतील चालकांसाठी कायम प्रेरणादायी राहील,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभात बाबासाहेब जमादार यांच्या २७ वर्षांच्या विनाअपघात, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सेवेचा गौरव करण्यात आला.उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवाराने त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!