हक्काचे भूखंड द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू – आगर ग्रामस्थांचे शिरोळ तहसीलसमोर बेमुदत धरणे

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
मौजे आगर (ता. शिरोळ) येथील शासकीय गट क्रमांक ८१३ मधील मंजूर भूखंडधारकांना अद्यापही प्रत्यक्ष भूखंडाचा ताबा मिळालेला नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारपासून शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.मंजुरी यादीतील लाभार्थ्यांच्या भूखंडांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून कब्जे हक्काची रक्कम स्वीकारून त्वरित भूखंडांचे वाटप करण्यात यावे,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ८१३ मधील भूखंडांसाठी अनेक लाभार्थ्यांनी शासनाने निश्चित केलेली कब्जे हक्काची रक्कम भरली असूनही त्यांना अद्याप भूखंडाचा ताबा देण्यात आलेला नाही. याशिवाय, एकाच भूखंडाचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना कबूलायतनामे देण्यात आल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.यापूर्वी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना केवळ आश्वासनांचा आधार देऊन चालणार नाही.भूखंडांवरील अतिक्रमणे हटवून त्वरित वाटप करण्यात यावे.अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून पुढील जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर मलगोंडा खडके, बाबूराव खडके, संजय खडके, वंदना बावचे, रसूल चिकोडे, सुभाष बावचे, राजू बावचे, रामकृष्ण रजपूत, संजय रजपूत यांच्यासह अनेक लाभार्थी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!