शिरोळ / प्रतिनिधी
वारस व फेरफार नोंद करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथील निमतानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांतील लाचखोरीविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.संजय बापू तेली (वय ५२, रा.आळते, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे असून ते उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथे निमतानदार म्हणून कार्यरत आहेत.तक्रारदार यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथे अर्ज केला होता. संबंधित कामाची जबाबदारी आरोपी संजय तेली यांच्याकडे होती. हे काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपीने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय तेली यांना रंगेहाथ पकडण्यात आले.या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रविंद्र पाटील यांचा सहभाग होता.दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास अथवा अपसंपदेबाबत माहिती असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री हेल्पलाईन १०६४ वर किंवा संबंधित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.