शिरोळ / प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर प्रभावी उपाय म्हणून वृक्षारोपणाला पर्याय नाही. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन शिरोळ नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.कल्पना पंडित काळे यांनी केले.
शिरोळ नगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान तसेच वटपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नगरपालिकेचे पदाधिकारी, स्थानिक महिला, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
येथील राजाराम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य कार्यक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कल्पना काळे यांच्या हस्ते वडाचे रोप लावून त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. सुवर्णा कांबळे, सौ. जागृती यादव, सौ. मनीषा भाट, सौ. मंगल भाट, सौ. सुलाताई जाधव, सौ. रंजना भाट, सौ. वनिता भाट, सौ. मयुरी तोरस्कर, शिक्षिका प्रतिभा साळोखे, अश्विनी पाटील, स्वाती जगदाळे तसेच परिसरातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी बोलताना सौ. कल्पना काळे म्हणाल्या की, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही चिंतेची बाब आहे. वृक्ष हे केवळ ऑक्सिजनचे स्रोत नसून पर्यावरणाचा समतोल राखणे, भूजल पातळी वाढविणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि तापमान नियंत्रणात ठेवणे यासाठीही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वटपौर्णिमेसारख्या धार्मिक परंपरांमधूनही वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजाला मिळतो. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक पंडित काळे, धोंडीराम दबडे, पत्रकार चंद्रकांत भाट, निरंजन यादव, रोहित भाट, पार्थ भाट, राकेश काळे, विराज काळे, प्रसाद यादव, राजाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक सनी सुतार, अध्यापक रवींद्र वाघ, सुनील घुमान्ना यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून हरित शिरोळ घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.