राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीचा उत्स्फूर्त सहभाग; १२५ बालकांना पोलिओ डोस

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण २०२६ अंतर्गत शासनाने २८ जून हा दिवस ‘पोलिओ निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला. या पार्श्वभूमीवर जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीच्या वतीने राष्ट्रीय सेवाभाव जपत पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात राबविण्यात आले.या अभियानासाठी तब्बल पंधरा दिवसांपूर्वीपासून नियोजन करण्यात आले होते. सोसायटी व परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची यादी तयार करून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. तसेच पोलिओ प्रतिबंधक डोसचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले.रविवारी सकाळी साडेसात वाजता अभियानास प्रारंभ झाला. विभागातील आशा सेविका मनीषा कोळी व प्रज्ञा लवटे यांनी डॉक्टरांच्या सहकार्याने बालकांना पोलिओचे डोस दिले. या दोन्ही आशा सेविकांनी घरोघरी जाऊन जनजागृती करत पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिल्याने अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत एकूण १२५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला.अभियानाचे उद्घाटन जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीचे अध्यक्ष अशोक गुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी पहिल्या बालकाला पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी ग्रुपचे संस्थापक सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी, महेंद्रजी पटेल, शंकर सर तसेच परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.राष्ट्रीय सेवाभाव जपत या उपक्रमात ग्रुपचे अनेक सदस्य सकाळी साडेसात वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. समाजहिताच्या आणि राष्ट्रीय आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग नोंदविण्याची परंपरा जायंटस जयसिंगपूर गोल्ड सिटीने कायम राखली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या यशस्वी अभियानासाठी आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!