तेरवाड गावाने स्त्री-पुरुष समानतेचा निर्माण केला आदर्श – ललित बाबर

Spread the love

​’घर दोघांचे अभियान’ अंतर्गत तेरवाड गावाचा शानदार गौरव सोहळा संपन्न

हेरवाड / प्रतिनिधी

“स्त्री आणि पुरुष हे कुटुंबाचे दोन समान आधारस्तंभ आहेत. मालमत्तेवरील अधिकार महिलांना खरा सन्मान देतो. शासनाच्या धोरणात जरी मालमत्तेवरील समान अधिकार मान्य केला असला, तरी समाजात अजूनही तो दृष्टिकोन पूर्णपणे निर्माण झालेला नाही. अशा परिस्थितीत घरावर पती-पत्नीच्या नावे संयुक्त पाट्या लावण्याच्या उपक्रमात तेरवाड गावाने घेतलेला पुढाकार समाजाला नवी दिशा आणि दृष्टिकोन देणारा आहे. तेरवाड गावाने ‘घर दोघांचे अभियान’ राबवून स्त्री-पुरुष समानतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी केले.डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि संविधान संवादक यांच्या वतीने आयोजित ‘तेरवाड ग्राम गौरव सोहळ्यात’ ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

सामाजिक मानसिकता बदलण्याची चळवळ

​पुढे बोलताना ललित बाबर म्हणाले की, समाजामध्ये स्त्रियांचे योगदान अनेकदा गृहित धरले जाते. घर सांभाळण्यापासून ते आर्थिक आणि सामाजिक स्तरावर योगदान देण्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना निर्णय प्रक्रियेत समान स्थान मिळणे आवश्यक आहे. ‘घर दोघांचे अभियान’ हे केवळ नावाच्या पाट्या लावण्यापुरते मर्यादित नसून, ही सामाजिक मानसिकता बदलण्याची एक चळवळ आहे. घराच्या दारावर संयुक्त नावाची पाटी लावणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा सन्मान करणे होय.

मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते

​या सोहळ्याला शिरोळचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड,उपसरपंच विजय गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजकल्याण सभापती सौ.श्रद्धा गायकवाड म्हणाल्या की “घर दोघांचे अभियानात गावाने पुढाकार घेतला आणि त्यासाठी गावाचा गौरव होत आहे, ही समस्त तेरवाडवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या अभियानामुळे गावात समानतेचा दृष्टिकोन निर्माण झाला असून, भविष्यातही स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.”

​शिरोळ गट विकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की, “प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत दप्तरी पती-पत्नीच्या नावे नोंदी करत आहोत,मात्र समाजातील मानसिकता बदलणे कठीण होते.संस्थेने हा उपक्रम राबवून तो बदल घडवून दाखवला आहे. या अभियानास शिरोळ तालुक्यात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.”

कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात चळवळ सक्रिय

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नंदू मोरे यांनी सांगितले की,भारतीय संविधानाने महिलांना हक्क दिले असले तरी आजही अनेक महिला त्यापासून वंचित आहेत. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ‘घर दोघांचे अभियान’ सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात राबवले जात आहे. तेरवाड गावाने संपूर्ण गावात पती-पत्नीच्या संयुक्त पाट्या लावून कौतुकास्पद काम केले आहे. संस्थेच्या संविधान संवादक माधुरी कांबळे आणि शर्मिला कांबळे यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी घेतलेले परिश्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.

पुस्तक प्रकाशन आणि उपस्थितांचा प्रतिसाद

​या कार्यक्रमात सिद्धार्थ अकॅडमीच्या दीक्षा कांबळे,उपसरपंच विजय गायकवाड,माधुरी कांबळे आणि शर्मिला कांबळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘आपत्ती व्यवस्थापन’ आणि ‘महिला जमीन अधिकार अभ्यास अहवाल’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोरे यांनी केले,तर आभार अमोल पाटील यांनी मानले.या सोहळ्यासाठी तेरवाड व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कदम,आनंदा कांबळे,मुस्तफा शिकलगार,समीक्षा कोळी,आयेशा पटेल,रचना कांबळे, बिस्मिल्ला जमादार,शैला कुरणे, प्रतीक्षा बुचडे आणि तेजस वराळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!