पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात भरधाव कारच्या धडकेत दोन पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. कार चालक अल्पवयीन असल्याची चर्चा परिसरात सुरू असून या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी परिसरातील कोरगावकर कॉलनीमध्ये असलेल्या सासका पतसंस्थेसमोर हा भीषण अपघात झाला. शिरोली औद्योगिक वसाहतीकडून शिरोली गावाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन महिलांना जोरदार धडक दिली.धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुसऱ्या कारवर आदळली. यामुळे दोन्ही कारच्या मध्ये महिला अडकून गंभीर जखमी झाल्या.अश्विनी गोपाळ परब (वय ५०) आणि उल्का काकासो माळकर (वय ४३, दोघी रा. शिरोली पुलाची) अशी जखमी महिलांची नावे असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारमध्ये दोन अल्पवयीन मुले होती. त्यापैकी एक जण कार चालवत होता आणि वाहन अतिवेगाने चालविले जात असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले. यामुळे अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, शिरोली परिसरात वाढती गुन्हेगारी, टवाळखोरी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन हा चिंतेचा विषय बनला आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्यामुळे अल्पवयीन मुले आणि तरुणांकडून बेफिकीर वाहनचालना होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिसरात नियमित गस्त, नाकाबंदी आणि वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या अपघातानंतर संबंधित चालक आणि वाहनमालकाविरोधात काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण शिरोली परिसराचे लक्ष लागले आहे. निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकट
अपघातानंतरची धावपळ नको; आधीच कडक कारवाई हवी!
शिरोली परिसरात अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, भरधाव वाहने आणि वाहतूक नियमांची पायमल्ली याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. नियमित गस्त, नाकाबंदी, वेगमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली असती तर अशा घटना टाळता आल्या असत्या, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवेळी अपघातानंतर कारवाईची आश्वासने दिली जातात; मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सातत्य दिसून येत नसल्याची टीकाही स्थानिकांमधून होत आहे.