पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी संघर्ष तीव्र; इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण हा शिरोळ तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर विषय बनला असून, नदीकाठावरील नागरिकांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचे मत व्यक्त करत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सोमवार (दि.१५ जून) रोजी इचलकरंजी शहरास जाणारा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर यापूर्वी अनेक आंदोलने झाली, विविध स्तरांवर चर्चा झाली; मात्र नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आंदोलन उभारले असून, कोणतीही तडजोड न करता प्रदूषणमुक्तीसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.धनाजी चुडमुंगे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन अंकुश संघटनेने सातत्याने एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. इचलकरंजीतील प्रक्रिया केंद्रांमधून निर्माण होणारे प्रदूषित पाणी कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीत सोडले जाऊ नये, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.नियमानुसार हे पाणी नदीत सोडण्याऐवजी शेतीसाठी वापरले जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात हे प्रदूषित पाणी स्वीकारण्यास कोणताही शेतकरी तयार नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.संघटनेच्या मते, प्रक्रिया केंद्र चालकांकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषित पाण्याची विल्हेवाट शेतीमध्ये लावली जात असल्याचे सांगण्यात येत होते.मात्र याबाबत प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर वास्तव समोर आले. अनेक ठिकाणी केवळ कागदोपत्री शेती दाखवण्यात आली होती, तर प्रत्यक्षात प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.या संदर्भातील अहवाल संबंधित विभागांना सादर करण्यात आले असून, विविध स्तरांवर बैठका आणि चर्चा देखील झाल्या. प्रदूषित पाणी स्वीकारण्यासाठी पुरेशी शेती उपलब्ध झाल्याशिवाय प्रक्रिया केंद्रे सुरू करू नयेत, असा निर्णय झाल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तथापि, प्रभावशाली घटकांच्या दबावामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नियमांना बगल देत प्रक्रिया केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.कायदा मोडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.प्रदूषित पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक शेती क्षेत्र उपलब्ध करून द्यावे आणि त्यानंतरच प्रक्रिया केंद्रांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, प्रशासन आणि प्रक्रिया केंद्र चालकांकडून कागदोपत्री दाखवलेल्या जमिनींमध्येच पाणी सोडण्याचे कारण पुढे करत प्रक्रिया केंद्रे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासन या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे आता तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता कुरुंदवाड नगरपालिकेसमोर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य व पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्याला व्यापक स्वरूप द्यावे, असे कळकळीचे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!