पुलाची शिरोली प्रतिनिधी
शिरोली येथील ज्ञानदीप विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील, लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा यादव व अनिता शिंदे, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील तसेच शिक्षक धर्मराज शिनगारे, धनवान राठोड आणि राजश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.विद्यार्थ्यांनीही आनंदाने या स्वागताचा स्वीकार केला.यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा करपे यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करावेत,असेही त्या म्हणाल्या. गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत, शिक्षक, पालक, युवक मंडळे आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शाळेचा परिसर, भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आदर्श शाळा उभारण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. केंद्रप्रमुख कृष्णात पाटील यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती व शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.