शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रोहित पवारांचा अन्नत्याग; कुटुंबाच्या अश्रूंनी आंदोलनस्थळ झाले भावूक

Spread the love

तिसऱ्या दिवशी कुटुंबाची भेट; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोहितदादांचा निर्धार कायम

पंढरपूर / प्रतिनिधी 

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलनस्थळी एक अत्यंत भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. सलग तीन दिवसांपासून अन्नाचा घास न घेतलेल्या रोहित पवार यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब आज आंदोलनस्थळी दाखल झाले.आई-वडील,पत्नी, बहीण आणि मुलांनी रोहित पवार यांची भेट घेतली.आपल्या लेकराला,पतीला आणि वडिलांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अन्नत्याग करताना पाहून कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्या. आंदोलनस्थळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, बळीराजाला त्याचा हक्काचा न्याय मिळावा आणि सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, या उद्देशाने रोहित पवार यांनी हा संघर्ष सुरू केला आहे.त्यांच्या या लढ्याला कुटुंबानेही खंबीर पाठिंबा दिला असून, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून त्यांनी रोहित पवार यांच्या निर्धाराला बळ दिले.आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यामध्येही या भेटीची मोठी चर्चा रंगली.शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आणि त्यामागे उभे असलेले त्यागी कुटुंब अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.दरम्यान,रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला.पंढरपूरच्या पवित्र भूमीत सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!