पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात शनिवारी रात्री पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून थेट सत्तुर फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून अन्य दोघे थोडक्यात बचावले आहेत.मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी तडजोडीचा सल्ला दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास माळवाडी परिसरात एका युवकाने आपली दुचाकी पार्किंगमधून काढताना शेजारी उभी असलेल्या दुचाकीला किरकोळ धक्का लागला.या क्षुल्लक कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि एका स्थानिक चिकन व्यावसायिकाने आपल्या हातातील धारदार सत्तुर पळून जाणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकून मारल्याचा आरोप आहे.सुदैवाने संबंधित तरुण प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने त्याचा जीव वाचला.मात्र, सत्तुर लागून एक जण जखमी झाला.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे आरोपी सत्तुर नाचवत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर पीडित युवक व नागरिक शिरोली पोलीस ठाण्यात दाखल झाले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंद होईल, अशी अपेक्षा असताना पोलिसांनी दोन्ही पक्षांना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवत तडजोडीचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने त्यांच्या भवितव्याचा मुद्दा पुढे करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.दरम्यान, माळवाडी परिसरातील वाढती टवाळखोरी, दादागिरी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार अमल महाडिक आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनाला आठवडाही उलटत नाही तोच सत्तुर फेकीसारखी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.“गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही का?”असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून,या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.