राज्यस्तरीय स्पर्धेत ७१ हजार रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह कायम चषकावर कब्जा
शिरोळ / प्रतिनिधी
हिंगणगादे (ता. खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंगणगादे प्रिमियर लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सनी स्पोर्टस् शिरोळ तालुका (४०+) संघाने दैदिप्यमान कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. कर्णधार शिवाजी संकपाळ आणि अमोल भोजणे यांच्या कल्पक, अनुभवी व प्रभावी नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेवर आपला ठसा उमटवत प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ७१ हजारांचे पारितोषिक आणि कायमस्वरूपी चषक जिंकला.या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुणे, कराड, विटा, हिंगणगादे, पलूस, रांजणी, कडेगाव, ईश्वरपूर, फलटण, तासगाव, म्हसवड, शेळकभाव यांसारख्या विविध भागांतील नामांकित संघांसह एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमधून मार्गक्रमण करत सनी स्पोर्टस् शिरोळ तालुका संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजेतेपद मिळवले.संघाच्या विजयामध्ये रवी चावरे, अनिल कुंभार, अमोल भोजणे, सागर रेपे आणि संदीप मकवाना यांच्या आक्रमक फलंदाजीचा मोठा वाटा राहिला. तर अनिल कुंभार, सागर रेपे, गणेश शिकलगार, विद्यासागर कत्ते आणि हसन तांबोळी यांच्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना अक्षरशः नामोहरम केले. विशेषतः अनिल कुंभार आणि सागर रेपे यांनी अष्टपैलू खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.स्पर्धेतील अंतिम सामन्यातील शानदार कामगिरीबद्दल संदीप मकवाना यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अनिल कुंभार यांना ‘उत्कृष्ट फलंदाज’ म्हणून आकर्षक क्रिकेट बॅट प्रदान करण्यात आली.विजयी संघात शिवाजी संकपाळ (कर्णधार), अमोल भोजणे, रवी चावरे, अनिल कुंभार, सागर रेपे, गणेश शिकलगार, हसन तांबोळी, अभय कुंभार, फिरोज हेतवडे, विद्यासागर कत्ते, मुदस्सर मुल्ला, धनाजी चव्हाण, मोहन शिकलगार आणि आयकॉन खेळाडू संदीप मकवाना यांचा समावेश होता. संघाच्या यशामागे विक्रम मोरे, अमित भोरे, उत्कर्ष कोळी, ओंकार कोळी आणि रुपेश पाटील यांचेही मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.या उल्लेखनीय यशामुळे शिरोळ तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून संघाचे अभिनंदन होत आहे.