७२ वर्षीय तुकाराम पाटील यांची जलतरणात अनोखी कामगिरी; ५० मीटर अंडरग्राउंड स्विमिंग अवघ्या १ मिनिट ४० सेकंदांत पूर्ण

Spread the love

कोरोची / प्रतिनिधी 

वय हा केवळ आकडा असतो, इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे कोरोची येथील तुकाराम पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. कोरोची गोलघुमट कॉलनी येथील ७२ वर्षीय तुकाराम पाटील यांनी इचलकरंजी येथील शंकराव पुजारी स्विमिंग टँकमध्ये ५० मीटर (सुमारे १७० फूट) अंडरग्राउंड स्विमिंगचे अंतर अवघ्या १ मिनिट ४० सेकंदांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली.वयाच्या ७१ वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात त्यांनी आपल्या फिटनेसचा आणि आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. सामान्यतः हे अंतर पूर्ण करण्यासाठी सुमारे अडीच मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र तुकाराम पाटील यांनी अवघ्या १ मिनिट ४० सेकंदांत हे अंतर पार करत उपस्थितांना आश्चर्यचकित केले.गेल्या ३५ वर्षांपासून ते नियमितपणे जलतरणाचा सराव करत आहेत. पूर्वी त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, अंगदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होता. तसेच कमरेतील दोन्ही डिस्क झिजल्यामुळे अनेक ठिकाणी उपचार घेतले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र त्यांनी शस्त्रक्रियेऐवजी जलतरणावर भर दिला. नियमित पोहण्यामुळे त्यांची शारीरिक स्थिती सुधारत गेली आणि अनेक व्याधींवर मात करण्यात त्यांना यश आले.जलतरणामुळे मिळालेल्या आरोग्यदायी जीवनशैलीमुळे ते अंडरग्राउंड स्विमिंगकडे वळले. सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्यांच्या या यशामुळे तरुणांनाही नियमित व्यायाम आणि जलतरणाचे महत्त्व पटले असून आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.या यशाबद्दल स्विमिंग कोच उदयसिंह निंबाळकर, कृष्णा तोरस्कर तसेच जलतरण व्यवस्थापक गंगाराम बर्गे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्रकाश पाटील, महादेव आलासे, महेश कांबळे, दत्ता मखुटे, सुरेश सुतार, आरव पाटील, अर्णव पाटील यांच्यासह स्विमिंग टँकचे सदस्य उपस्थित होते.तुकाराम पाटील यांच्या या प्रेरणादायी कामगिरीने वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्य, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर नवे विक्रम घडवता येतात, हे पुन्हा अधोरेखित केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!