शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ आणि पंचक्रोशी परिसरातील एक धाडसी,तडफदार आणि लोकप्रिय युवा व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले प्रशांत तथा उर्फ बाळ जनार्दन बाबर यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण शिरोळ शहरासह पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या परिवारावर तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.बाळ बाबर हे त्यांच्या धाडसी, बेधडक आणि करारी स्वभावामुळे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय होते.कोणत्याही परिस्थितीत मागे न हटणारे आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या स्वभावात बेदरकारपणा असला तरी मन मात्र अत्यंत प्रेमळ आणि माणुसकीने ओथंबलेले होते. त्यामुळेच त्यांनी अल्पावधीत असंख्य मित्र आणि चाहत्यांचा मोठा परिवार जोडला होता.समाजातील कोणत्याही व्यक्तीवर संकट आले की मदतीला सर्वात आधी धावून जाणारे नाव म्हणजे बाळ बाबर असे मानले जात होते.मित्र, नातेवाईक, सामान्य नागरिक यांच्याशी त्यांनी कायम जिव्हाळ्याचे संबंध जपले.युवकांमध्ये त्यांचे नेतृत्व वेगळ्या उंचीवर पोहोचले होते. सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेत अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शिरोळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.विशेषतः त्यांचे बंधू, परिवार आणि जिवलग मित्रांना हा धक्का अत्यंत वेदनादायी ठरत आहे.परिसरातील विविध स्तरांमधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.प्रशांत उर्फ बाळ बाबर यांच्या रूपाने समाजातील एक धाडसी, दिलदार आणि मदतीस तत्पर असलेले युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आठवणी कायम सर्वांच्या मनात जिवंत राहतील.ईश्वर त्यांच्या मृत पवित्र आत्म्यास चिरशांती देवो,हीच भावपूर्ण श्रद्धांजली.