दत्तवाड / प्रतिनिधी
दत्तवाड येथील हायस्कूल रोड परिसरातील सुपरिचित व ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या ‘दत्त वस्त्रम’ या कापड दुकानाला आज रविवार दिनांक २४ मे रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांच्या कापडाचे नुकसान झाले.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार,दुकानाच्या तळघरात असलेल्या लहान मुलांच्या कपड्यांच्या विभागात प्रथम आग लागल्याचे निदर्शनास आले.पहाटेच्या वेळी दुकानातून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर येताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले.त्यांनी तातडीने दुकान मालक व अग्निशामक दलाला माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच गुरुदत्त शुगर टाकळीवाडी येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशामक जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.वेळेत आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली,मात्र तळघरातील लहान मुलांचे कपडे तसेच इतर कापड साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले.प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून नेमक्या नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.