“धक्कादायक” शिरोळ नगर परिषदेकडील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा बोजवारा, रखरखत्या उन्हात तहानले नागरिक

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शिरोळ नगर परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.सर्वसामान्य नागरिक,महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना तहान भागवण्यासाठी नगर परिषद कार्यालयात कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या अनास्थेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शिरोळ नगर परिषदेकडून कार्यालयाबाहेर नागरिकांसाठी फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हे फिल्टर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे या फिल्टरवर धुळीचे थर साचले असून त्याची स्वच्छताही करण्यात आलेली नाही.त्यामुळे हे फिल्टर वापरण्यायोग्य आहेत की नाहीत,असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.दरम्यान, या ठिकाणी पाणी पिण्यासाठी साध्या ग्लासची देखील व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तहानलेल्या अवस्थेत नगर परिषदेमध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.नगर परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळू शकत नसेल तर मग कर भरून आम्हाला नेमकं काय मिळतं? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे,प्रत्येक काम कायद्यानुसार आणि “शासनाच्या यादीत” असणाऱ्या नियमाप्रमाणेच केले जाते, अशी भाषा करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरिकांची ही मूलभूत गरज दिसत नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.रखरखत्या उन्हात नागरिकांचे घशाला कोरड पडत असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.शिरोळ नगर परिषदेमध्ये दररोज विविध कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. अशावेळी त्यांच्यासाठी स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेले फिल्टर सुरू करावेत, परिसराची स्वच्छता करावी तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी आता सर्वसामान्य करदात्यांमधून जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!