“ब्रेकिंग बातमी” सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करून देण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.ही कारवाई सोमवार (दि.१८) नांदणी येथे करण्यात आली.याप्रकरणी अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय ४४, मंडळ अधिकारी, नृसिंहवाडी,अतिरिक्त कार्यभार नांदणी आणि शिवाजी आनंद जाधव (वय ६१) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रारीत,कोर्टाच्या आदेशानुसार सातबारावर नाव नोंद करण्यासाठी आरोपींकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे नमूद केले होते.तक्रारीनंतर लाचलुचपत पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली.त्यामध्ये आरोपींनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.पुढे तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले.यानंतर लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला.मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर यांनी तक्रारदारास ६० हजार रुपये शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले.तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर शिवाजी जाधव यांनी ती स्वीकारताच लाचलुचपत पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ आणि ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली.ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तर पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!