विना क्लास दहावीमध्ये ‘सेंच्युरी’; ऋजुता पाटीलचे घवघवीत यश

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

आजच्या स्पर्धात्मक युगात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग, ऑनलाइन मार्गदर्शन आणि विविध कोचिंग क्लासेस जवळपास अनिवार्य मानले जात असताना न्यू पॅलेस परिसरातील कु. ऋजुता पाटील हिने मात्र केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.कोणत्याही प्रकारचा क्लास अथवा खासगी शिकवणी न लावता तिने मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.ऋजुताने संस्कृत आणि विज्ञान या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवत आपल्या अभ्यासातील सातत्य आणि सखोलता सिद्ध केली आहे. गणित विषयात तिला ९९ गुण मिळाले असून सामाजिक शास्त्र विषयात ९८ गुण प्राप्त झाले आहेत. इंग्रजीमध्ये ९५ तर मराठी विषयात ९२ गुण मिळवत तिने सर्व विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार तिला ५०० पैकी ४९२ गुण मिळाले आहेत. याशिवाय भरतनाट्यम नृत्य प्रकारातील गुणवत्तेचे ८ अतिरिक्त गुण मिळाल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० इतके झाले आहेत.विशेष म्हणजे, अभ्यासासोबतच तिने आपला कलात्मक प्रवासही अखंड सुरू ठेवला.भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात ती ‘विशारद’ स्तरापर्यंत पोहोचली असून दहावीच्या तयारीच्या काळातही तिने नृत्याचा सराव खंडित होऊ दिला नाही.शिक्षण आणि कला यांचा सुंदर समतोल राखत तिने सर्वांगीण प्रगतीचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहे.करवीर तालुक्यातील भुयेवाडी हे ऋजुताचे मूळ गाव असून सध्या तिचे कुटुंब न्यू पॅलेस परिसरात वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच तिला वाचनाची विशेष आवड होती.विविध विषयांवरील पुस्तके,साहित्य,विज्ञानविषयक लेख आणि सामान्य ज्ञान यांचे सातत्याने वाचन केल्यामुळे तिची भाषा विषयांवरील पकड अधिक मजबूत झाली. याच वाचन संस्कृतीचा फायदा तिला गणित आणि विज्ञानासारख्या विषयांचे सखोल आकलन करण्यासाठी झाला.आपल्या यशाबद्दल बोलताना ऋजुता म्हणाली, “लहानपणापासूनच मी चौफेर आणि सखोल वाचन करत आले. त्यामुळे भाषा विषय सोपे झाले आणि त्याचा उपयोग गणित व विज्ञानातील अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेण्यासाठी झाला. नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला; पण बोर्ड परीक्षेचा अनावश्यक ताण घेतला नाही. स्वयंअध्ययनावर भर दिल्यामुळे मला अतिरिक्त शिकवणी वर्गाची गरज भासली नाही.”ऋजुताची शैक्षणिक प्रगती यापूर्वीपासूनच उल्लेखनीय राहिली आहे. इयत्ता आठवीमध्ये तिने शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली होती. तसेच राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये अभिनव विज्ञान उपक्रम सादर करून तिने राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. विज्ञान विषयातील विशेष आवड आणि अभ्यासू वृत्तीमुळे ती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने सहभागी होत आली आहे.विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी होमी भाभा विज्ञान परीक्षा तिने उत्तम प्रकारे दिली असून त्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक स्तरापर्यंत ती पोहोचली होती. वैज्ञानिक दृष्टीकोन, निरीक्षण क्षमता आणि संशोधनात्मक वृत्ती यांचा उत्तम संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. शालेय शिक्षणासोबतच सामाजिक जाणीवही ती जपते. विविध प्राणी कल्याण कार्यक्रमांमध्ये सहभागी होत ती संवेदनशीलतेचा आदर्शही निर्माण करत आहे.ऋजुता ही श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय ची विद्यार्थिनी असून तिच्या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा असल्याचे तिने नमूद केले.आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा ताण, कोचिंग क्लासेसवरील अवलंबित्व आणि गुणांच्या स्पर्धेमध्ये हरवणारा आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर ऋजुताचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी मानले जात आहे. स्वअभ्यास, वाचन, वेळेचे नियोजन आणि सातत्य यांवर भर दिल्यास विद्यार्थ्यांना यश मिळवता येते, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.भविष्यात विज्ञान शाखा निवडून जैवपशुवैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा ऋजुताने व्यक्त केली आहे. विज्ञान आणि समाजहित यांचा संगम साधत संशोधन क्षेत्रात योगदान देण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!