पुलाची शिरोलीत ‘गाव बंद’ शंभर टक्के यशस्वी
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
प्रेम प्रकरणाचा गैरफायदा घेऊन अश्लील व्हिडिओ तयार करून स्थानिक मुलींची बदनामी केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे पुलाची शिरोली परिसरात उद्रेक पहायला मिळाला आहे.या प्रकरणातील आरोपींचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने पुकारलेला गाव बंद शंभर टक्के पाठींबा मिळाला.या घटनेतील आरोपींचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये,अशी आक्रमक मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी केली आहे.या घटनेच्या निषेधार्थ शिरोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीसमोर निषेध सभा पार पडली.याबाबतची माहिती अशी की शाहिद समीर सनदे या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चांदीच्या शहरातील एका मुलीने याला वाचा फोडली आहे.याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या कृत्यात त्याचा मित्र शाहरुख देसाई याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.या नराधमांना कठोर शासन होण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
यावेळी आमदार अमल महाडिक यांनी संताप व्यक्त करताना, अशा प्रवृत्तींनी गावाला बदनाम करण्याचे काम केले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच पीडित मुलींनी पुढे येऊन तक्रार करावी, त्यांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा,त्याला गावातून हद्दपार करा, त्याला फाशी द्या.अशी संतप्त व आग्रही मागणी केली.यावेळी आमदार अमल महाडिक यांनी ग्रामपंचायतीने संबंधित आरोपींचे पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी गावामध्ये घडलेली घटना ही हिंदू समाजाला काळीमा फासणारी आहे.अशी कृत्ये करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शासन झाले पाहिजे. तसेच वेळप्रसंगी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचाही कठोर निर्णय सकल हिंदू समाजाला घ्यावा लागेल असे मत व्यक्त केले.
माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी गावातील तसेच बाहेरील हिंदू मुलींचे लैंगिक शोषण करून गावाला बदनाम करण्याचा हिन प्रकार या नराधमाने केला आहे. त्यांचे कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेऊ नये व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कलमे लावून जास्तीत जास्त सजा होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी ठाम मागणी केली.
उद्योजक राहुल खवरे म्हणाले, शिरोली गावामध्ये हिंदू महिलांचे शारीरिक व लैंगिक शोषणाची घटना घडली आहे.हि घटना अत्यंत निंदनीय व लाजीरवाणी घडली आहे. त्यातील आरोपींना प्रोत्साहन देणाऱ्यांचा ही यामध्ये समावेश असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.दरम्यान आमदार अशोक माने,उबाठा शिवसेनेचे उपनेते संजय पवार,विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली. सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले.पण दिवसभर शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती.यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,सपोनी सुनील गायकवाड,फौजदार अमित पांडे यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक, आणि शिरोली व गांधीनगर पोलीसांनी शिरोली फाटा, छत्रपती संभाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय,जुने हायस्कूल तसेच आरोपी सनदे आणि देसाई यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक सुरेशराव यादव, राहुल खवरे, सतिश पाटील,अर्जून चौगुले, प्रकाश कौंदाडे, योगेश खवरे, सतिश रेडेकर, बाळासाहेब पाटील, दिपक रानमाळे, धनाजी पाटील, राजकुमार पाटील,संपत संकपाळ,सागर कौंदाडे, डॉ.निनल मणियार, डॉ.समर पद्माई,दिपक यादव,अशोक खोत, रोहीत खवरे, राहूल अष्टेकर आदीसह मेडिकल असोसिएशन,डॉक्टर असोसिएशन, हाॅटेल व्यावसायिक,पानपट्टी व किराणा असोसिएशन, पेट्रोल पंप, कार शोरुम आदींनी आपले उद्योग,व्यापार व व्यवसाय शंभर टक्के बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.